मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी नुकतेच मोठे वक्तव्य केले होते. एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी म्हटले होतं, त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचे पहायला मिळत आहे. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्रिपदाची आदला-बदली करत असतो. कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते मुख्यमंत्री असतात. शिंंदेंना मुख्यमंत्रिपद दिले तर ते पुन्हा परत करतात असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
खरे म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की मी आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही अदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, तर कधी ते मुख्यमंत्री असतात. कधी मी उपमुख्यमंत्री असतो तर कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्यांच्या जागी ते भाषण करणार आहेत. आणि त्यांना जर मुख्यमंत्रिपद दिले तर ते सेफ असते, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतात, हे मला माहिती असल्यामुळे मी रिस्क घ्यायला मागे-पुढे पाहिलेले नाही असे यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या दौ-याची टिंगल केली गेली होती असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा घराबाहेर पडले, त्याचा आनंद आहे असा खोचक टोला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. हे चांगले आहे, विरोधी पक्षांचे ते कामच आहे. पहिल्यांदा उद्धवजी घराबाहेर पडले आहेत, याचा मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाहीत. मी तर यापूर्वीच सांगितले आहे, विकासावर केलेले त्यांचे एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

