सोलापूर, – अज्ञात कारणावरून आयटीआयच्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना विजापूर रोड येथील सुंदरम नगरात उघडकीस आली.
सतीश बसप्पा गायकवाड असे गळफास लावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मयत सतीश हा विजापूर रोडवरील आयटीआयमध्ये ड्राफ्ट्समन विभागात शिकण्यास होता. त्याचे वडील ड्रायव्हर म्हणून एका ठिकाणी कामाला आहेत. बुधवारी सतीशच्या आजोबांचे वर्षश्राध्द असल्याने घरचे लोक बोळकवठा या गावी मंगळवारी गेले होते. सतीश घरात एकटाच होता. त्यामुळे आईने सतीशला दुपारी अनेक वेळा फोन लावला. मात्र, काही उत्तर न मिळाल्याने आईने शेवटी सतीशच्या मित्राला फोन करून ही कल्पना देऊन घरी जाण्यास सांगितले.
त्याप्रमाणे सतीशचे मित्र दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून पाहिले असता सतीश पंख्याला लटकत असताना त्यांना दिसला. तेव्हा सदरचा दरवाजा तोडण्यात आला. त्वरित सतीशला गळफासावरून उतरवून उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात शेजारील श्रीकांत शिंदे यांनी बेशुध्द अवस्थेत दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.