मुंबई : मुंबईतील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी संप आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे ओपीडी पेशंटवर उपचार मिळण्यास अडचणी येणार असून रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मुंबईतील निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने या संपाला पाठिंबा दिल्याने मुंबईतील रुग्णसेवा बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईतील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप आंदोलन सुरू केले आहे. त्याला केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दिला आहे. सोमवारी आठवड्याचा पहिलाच दिवस असताना रुग्णालयात गर्दी असताना जे. जे.च्या निवासी डॉक्टरांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केल्याने त्याचा फटका हजारो रुग्णांना बसणार आहे. त्यामुळे ओपीडीतील रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येणार आहेत.
या मुंबईतील जे. जे. रुग्णालयात सर्वाधिक ओपीडीची (बा रुग्ण विभाग) संख्या असते. जे. जे. रुग्णालयातील त्वचा विभागातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते.
जे. जे. रुग्णालयातील त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण कुरा यांच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला आहे. रुग्णांचे मृत्यू, निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी, सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि विभागप्रमुखांकडून सातत्याने होणारा त्रास अशा विविध कारणांमुळे जे. जे. रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.