27.4 C
Latur
Monday, November 18, 2024
Homeमहाराष्ट्रजळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार

जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार

जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. त्यातच आता जळगावमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञाताकडून आज पहाटे चारच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलिस तपास सुरू आहे.

तीन रिकामी काडतुसे आढळली
अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या. यामुळे मोठा आवाज झाल्याने शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन खडबडून जागे झाले. त्यांनी याबाबत तपास केला असता काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन रिकामी काडतुसे आढळून आली.

पोलिस संरक्षण मिळणार
दरम्यान, शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अहमद हुसैन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस गोळीबार करणा-यांचा कसून शोध घेत आहेत. तर अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांना पोलिस संरक्षण मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR