मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. २०० कोटींच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर बरोबर जॅकलीनचे नावही समोर आले. सुकेशने जॅकलीनला बरेच महागडे गिफ्ट्स दिले होते. ते दोघे रिलेशनशिपमध्येही होते. अटक झाल्यानंतर सुकेश तुरुंगातून जॅकलीनला अनेकदा प्रेमपत्र पाठवत असतो. यालाच वैतागून जॅकलीनने कोर्टात धाव घेतली आहे.
जॅकलीन फर्नांडिसने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि मंडोली जेलच्या अधीक्षकासाठी आदेशाची मागणी केली. सुकेशकडून तिला कोणतेही पत्र येऊ नये यासाठी तिने पटियाला हाऊस कोर्टाकडे मदत मागणी केली आहे. तसेच तिला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संपर्क करण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे असेही तिने याचिकेत म्हटले आहे. सुकेश चंद्रशेखर सतत अनेक इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्राचा प्रसार करत आहे असा आरोपही तिने केला. हे पत्र माध्यमांमध्ये आले की तिच्यासाठी अडचण ठरते असेही ती म्हणाली. अशा प्रकारे पत्रांचा प्रसार केल्याने धमक्यांना वाव मिळतो. तिच्या सुरक्षेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण जॅकलीन या प्रकरणात साक्षीदार आहे.
ईओडब्ल्यूने जॅकलीनच्या याचिकेचे समर्थन केले असून ते म्हणाले, ‘सुकेशने अशा प्रकारे माध्यमांमध्ये पत्राचा प्रसार करणे हे न केवळ याचिकाकर्त्याला त्रास देणारे आहे उलट तिला धमकावणारे आहे. तिच्या सामाजिक आणि व्यावसायिक कामावर प्रभाव टाकणारे आहे.’ युक्तिवाद पाहता न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी १७ जानेवारी २०२४ रोजी होईल असे आदेश दिले आहेत.