अमरावती : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अमरावतीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकन सभेत अज्ञात व्यक्तीकडून चिठ्ठीतून धमकी देण्यात आली आहे. ‘जास्त उडउड करू नका, तुलाही केजरीवालसारखं जेलमध्ये टाकू, नाहीतर उडवून टाकू,’ अशी धमकी देण्यात आली आहे.
बुधवारी (दि. ३) शहरातील नेहरू मैदानात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकनासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना खांद्यावर घेतले होते.
दरम्यान भाषणासाठी जात असताना त्यांच्या हातात कुणीतरी धमकीची चिठ्ठी दिली. याची माहिती सभा सुरू असताना भाषणातूनच कडू यांनी उपस्थितांना दिली. रात्री उशिरा प्रहारचे महानगरप्रमुख बंटी रामटेके यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.