टोकियो : जपानच्या मून मिशन अंतर्गत चंद्राकडे झेपावलेले मून स्रायपर यान अखेर चंद्रावर पोहोचले. जपानसाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली असून यामुळे चंद्रावर पाऊल ठेवणारा जपान हा जगातील पाचवा देश ठरला. जपानची स्पेस एजन्सी खअअ ने हे यान प्रक्षेपित केले होते. पिन पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे जपानने ही मोहीम फत्ते केली.
अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीन आणि भारत ही एकमेव राष्ट्रे आहेत ज्यांनी आतापर्यंत ही कामगिरी केली आहे. त्यात आता जपानचा देखील समावेश झाला आहे. चंद्र विषुववृत्ताच्या अगदी दक्षिणेला असलेल्या एका विवराच्या उतारावर ‘पिनपॉइंट तंत्रज्ञान’ द्वारे ‘मून स्रिपर’ हे यान उतरलं आहे.
या कामगिरीबद्दल सांगताना प्रकल्प व्यवस्थापक शिनिचिरो सकाई म्हणाले, इतर कोणत्याही राष्ट्राने हे साध्य केलेले नाही. यामुळे आम्हाला आर्टेमिस सारख्या आगामी आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये मोठा फायदा होणार आहे.
पिन पॉईंट तंत्रज्ञानाचा फायदा काय?
या पिनपॉईंट तंत्रज्ञानाचा वापर जपानने दोन लघुग्रहांवर यशस्वीरित्या प्रोब उतरवण्यासाठी यापूर्वी केला होता. या पिन पॉईंट तंत्रज्ञानामुळे उच्च-सुस्पष्टता, भविष्यात चंद्रावरील डोंगराळ भाग तसेच ध्रुवांवरील ऑक्सिजन, इंधन आणि पाण्याचा संभाव्य स्रोत शोधण्यास मदत होणार आहे. यापूर्वी जपानच्या दोन चांद्रमोहिमा अपयशी ठरल्या होत्या.