छ. संभाजीनगर : मनोज जरांगे यांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या आंदोलनाला शनिवारी (२७ जानेवारी) मोठे यश मिळाले. दरम्यान, हे आंदोलन अनेकांसाठी आदर्श असल्याचे म्हटले जात आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम समुदायाला या आंदोलनातून शिकण्याचा सल्ला दिला आहे. इम्तियाज जलील म्हणाले, मनोज जरांगे हे खूप प्रामाणिक आणि निष्ठावंत आहेत.
एका छोट्याशा गावातील एक सामान्य माणूस आंदोलन करू लागला आणि त्याच्यामागे लाखोंच्या संख्येने लोक जेव्हा उभे राहतात तेव्हा एक संदेश जातो की आता लोकांचा राजकीय नेत्यांवरचा, पुढ-यांवरचा विश्वास उडाला आहे. मनोज जरांगे पाटील हा एक सामान्य माणूस आहे. तरीदेखील त्यांच्यामागे इतके लोक का उभे राहिले? त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची निष्ठा हीच या लोकांना एकत्र आणण्याचे प्रमुख कारण आहे. मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचे आहे, ही मनोज जरांगेंची भावनाच लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. आज त्यांना मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे उदाहरण देत खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम समुदायाला आरक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहिले की, मला एका गोष्टीची खंत वाटते की, आमचे लोक मुस्लिम समुदाय असे एकत्र येत नाहीत. मला वाटतं की, आमच्या समाजातील लोकांनीही त्यांच्यातले राजकीय मतभेद विसरून एकत्र यावे.
आपसातले वाद मिटवून एकत्र आलो तर आमच्या अनेक मागण्या आम्ही पूर्ण करू शकतो. सर्वच समाजांनी मनोज जरांगेंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. प्रामुख्याने मुस्लिम समाजाने त्यांच्याकडून धडा घ्यायला हवा.
इम्तियाज जलील म्हणाले, मराठे आमचे मोठे भाऊ आहेत. आमचा त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. आज तुमच्या लढाईत आम्ही सहभागी आहोत. यात आमची एवढीच अपेक्षा आहे की, आम्ही आमच्या आरक्षणाची लढाई लढू तेव्हा मराठेदेखील आमची साथ देतील. मनोज जरांगे यांच्यासारखा एखादा नेता आमच्यातून उभा राहिला तर मी त्याच्याबरोबर असेन.