जालना : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी गेल्या १७ दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र, शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आता मुंबईकडे कूच केली आहे. अंतरवाली सराटीतून आज त्यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला असून आझाद मैदानात ते उपोषणाला बसणार आहेत. यापूर्वी दोनवेळा मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली. तरीही नियोजित दौ-यानुसार जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली. दरम्यान, अंतरवाली सराटी येथून निघताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. गाडीत बसताच त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी समाजाच्या लेकरांसाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून निघताना त्यांच्यासोबत त्यांचे मोजके समर्थक, दोन गाड्या आणि दोन रुग्णवाहिका होत्या. निघण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि ते डिफेंडर गाडीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी अंतरवालीत समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
तत्पूर्वी त्यांनी समाजाच्या लेकरांपेक्षा मला मोठे काय आहे, त्यांच्या कल्याणासाठी मी जात आहे. सरकारला वाटत आहे की, मी त्यांना शरण यावे. पण समाजाच्या लेकराला अर्धवट सोडून मी समाजाला धोका देऊ शकत नाही. मला ते मारून टाकणार आहेत, म्हणून मी आझाद मैदानावर जात आहे. मी माझ्या समाजाला त्रास होऊ देणार नाही. मी लढून मरेल, असे जरांगे म्हणाले. न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवायचा आणि तीच परवानगी समजायची. माझे सगळ््यांना आवाहन आहे की, शांत राहा. तुमच्या लेकरांसाठी मी लढेन. मी जिवंत असो की नसो तुम्ही समाज मोठा करा, असे जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईतील आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे पुन्हा अर्ज दाखल करण्यात आला. यापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारण्यात आल्यानंतर तिस-यांदा अर्ज करण्यात आला. या अर्जामध्ये ५० जणांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. नव्या अर्जात आंदोलनासाठी घालण्यात येणा-या सर्व नियम आणि अटींचे पालन केले जाईल, असे नमूद केले आहे. तसेच १८ सप्टेंबर रोजी ठरवून दिलेल्या वेळेतच आंदोलन करण्यात येईल, असेही पत्रात नमूद केले आहे.
जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी परवानगी मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गणेशोत्सवास परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. पोलिसांवर याचा ताण पडण्याची शक्यता असल्याने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.
आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
मी मुंबईला जात आहे. तुम्ही आशीर्वाद द्यायला या. मला मारायचे तर मारू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. पायात आणि पोटात आग होते, असे जरांगे पाटील म्हणाले.
जरांगेंना अश्रू अनावर
मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. मी अंमलबजावणी करायला लावल्याशिवाय आता थांबणार नाही. मारू द्या मारले तर मी आझाद मैदानातच बसणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
सुरक्षेत वाढ
मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, त्यांना एसपीयू सुरक्षा देण्यात आली आहे. एसपीयू अर्थात ज्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस कॉन्स्टेबल सतत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असणार आहेत. अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत मनोज जरांगे यांना ही विशेष सुरक्षा असणार आहे.
















