मुंबई : हभप अजय बारस्कर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. जरांगेंनी संत तुकाराम महाराजांची मागितलेली माफी ही अहंकार मिश्रीत होती, अशा शब्दांत सडकून टीका केली. जरांगेंवर मी नव्हे तर त्यांच्या सहका-यांकडून आरोप करण्यात आले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बारस्कर म्हणाले, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर जरांगेंकडे नसल्याने त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. माझी ३०० कोटींची संपत्ती आहे तर मी ४० लाख रुपये का घेऊ? असा सवाल त्यांनी केला. तसेच जरांगेंनी माझ्याविरोधात केलेला विनयभंगाचा आरोपही खोटा असून जरांगे आता बेछूट आणि बेताल झाले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. पुराव्यांशिवाय जरांगे माझ्यावर आरोप करत आहेत. लोणावळ्यातील सभेवेळी सरकारी अधिका-यांशी बंद दरवाजाआड काय डील झाली? असा सवाल पुन्हा एकदा त्यांनी उपस्थित केला.
देहू संस्थानला केली विनंती
बारस्कर म्हणाले, तुकाराम महाराजांना जरांगे यांनी ‘संत फंत’ असा शब्द वापरला हे देहू संस्थान सहनच कसे करतात. देहू संस्थानशी माझा काही संबंध नाही. कारण तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत मोरे, तेच शिळा मंदिराचे ट्रस्टी आहेत. पण माझी त्यांना विनंती आहे की, तुकोबारायांचे अभंग तिथे बदलले गेलेत त्यावर आपण भाष्य करायला पाहिजे ना?
जरांगेंच्या आरोपांना थेट आव्हान
बारस्करांनी जरांगेंना आव्हान देताना म्हटले की, जरांगेंनी माझ्यावर बलात्काराचा आणि विनयभंगाचा आरोप केला. तर मग त्या पीडित महिला त्यांनी समोर आणाव्यात. त्याचबरोबर मी प्रश्न आरक्षणाबाबत विचारले, पण जरागेंनी त्याची उत्तरे दिली नाहीत. मागच्या १७ दिवसांचे आंदोलन सुरु होते तेव्हा जरांगे कोणाच्या घरात बसून दुध भाकरी खात होते? कोणाकडून पाय दाबून घेतले? याचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर कोणत्या महिलेला अंबडचा आमदार बनवण्याचे आश्वासन दिले, हे मला माहिती आहे. पण आमची संस्कृती ती नाही. रातोरात जरांगेंकडे मोठा पैसा आला याविरोधात मी इन्कम टॅक्स आणि ईडीकडे जाणार आहे, असेही बारस्कर यावेळी म्हणाले.
सर्व चौकशांना तयार
माझ्यावर जे आरोप झाले त्यावर चौकशीसाठी मी तयार आहे. नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टसाठी देखील मी तयार आहे, असेही बारस्कर यांनी शनिवारच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी ११ वाजता दुसरे अजून काही जण पत्रकार परिषद घेऊन जरांगेंबद्दल माहिती देतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.