जालना : मराठा आरक्षण तातडीने लागू करावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. गेले पाच दिवस त्यांनी काही खाल्ले व प्यायले नसल्याने त्यांची प्रकृती खालावली असताना देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. मात्र, ग्रामस्थांच्या आग्रहामुळे त्यांनी अखेर उपचार घेतले.
सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे मराठवाडा मुक्तिदिनापासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, जरांगेंना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणे देखील मुश्कील झाले होते. सहका-यांचा आधार घेत ते चालताना दिसत होते. ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हते.
दरम्यान, त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. मध्यरात्री पावणेदोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यापासून अद्याप सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी सहा वेळा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
जरांगे पाटील यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत?
सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे, बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे आणि मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, या मागण्या जरांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या आहेत.