वडीगोद्री (संभाजीनगर) : मराठा आरक्षणासाठी सरकारने धोका दिल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्याची वेळ आली आहे. शरीर किती दिवस साथ देईल माहीत नाही. समाज उपोषण करू नका अशी विनंती करत आहे, मात्र त्यांच्यासाठीच बेमुदत उपोषणास सुरुवात करत आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करायचे की, उमेदवार पाडायचे याचा निर्णय २७ ऑगस्टला घेण्यात येईल, तोवर मराठा समाजाने तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
ईडब्ल्यूएस, एसइबीसी, कुणबी असे तिन्हीही पर्याय मराठा मुलांना भरतीसाठी सुरू ठेवा, नोकर भरतीत जात प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी ६ महिन्याची मुदत द्या. सारथीच्या मुलांना काय अडचणी आहेत जरा त्यांना विचारुन बघा. दादा तुम्ही म्हणता मुलींना शिक्षण मोफत केलं या अंतरवालीत बघा कुठं सुरुय मोफत शिक्षण बघा जरा असे चंद्रकात पाटील यांना जरांगे यांनी सुनावले.
सरकारने फक्त योजनेच्या नावाखाली लोक नादाला लावले आणि योजनेच्या अंमलबजावणीचा पत्ता नाही, म्हाडा, समृद्धी, शक्ती मार्गात हेच पाहायला मिळालं. मराठा, धनगरांना येड्यात काढायचं आणि आरक्षण द्यायचं नाही असं तुम्हाला करायचं आहे का? लाडकी बहीण त्यासाठी आणलीय का, लाडका भाऊ त्यासाठी आणले आहे का? आता लाडकी मेव्हणी देखील येईल, सरकारने हा डाव टाकला आहे. निवडणूक झाली की हे सगळं बंद पडेल, लाडक्या बहिणीचे दिड हजार घेऊन काहीही होणार नाही. आमचं म्हणणं आहे हे देऊ नका आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली.
२८८ जागांचा निर्णय २९ ऑगस्टला
२९ ऑगस्टला राज्यातील आंदोलनाची वर्षपूर्ती आहे. या दिवशी बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार पाडायचे का नाही हे ठरवू. १३ तारखेपर्यंत मी दौ-यावर असेल. पण १३ ते २० ऑगस्ट दरम्यान बैठका घेणार आहे. २८८ मतदार संघात तयारी करा. २० ते २७ ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व इच्छुकांनी यावे. आपल्याला सर्व जातींची मोट बांधायची आहे. सर्व समाजाला आमचं निमंत्रण आहे. सर्वांनी एकमेकांच्या जातींना निवडून आणायचं आहे. क्रॉसिंग करायचं नाही. आपण जर निवडणूक लढवू म्हटलं तर युती वाले खुश होतायत, निवडणूक लढवली नाही तर महाविकास आघाडीवाले खुश होतात.