छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासकांनी घेतला आहे. जायकवाडीत उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती कडाच्या अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी दिली.
जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सोबतच जालना, छत्रपती संभाजीनगर या शहरांसह अन्य लगतच्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी प्रकल्पातून आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील विविध औद्योगिक वसाहतींना जायकवाडी प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होतो.
गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ५२ टक्के जलसाठा होता. समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणांतून मराठवाड्याला पाणी मिळावे, यासाठी प्रखर आंदोलन केल्यानंतर ८ टीएमसी पाणी मिळाले होते. यानंतर जायकवाडीतून रबी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. आता रबीचे आवर्तन २६ जानेवारीपासून सुरू झाले आहे. हे आवर्तन २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. दरवर्षी उन्हाळी पिकांसाठी जायकवाडी प्रकल्पातून ४ आवर्तने दिली जातात. आता प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा उरल्याने यंदा उन्हाळी पिकासाठी पाणी न सोडण्याचा निर्णय कडा प्रशासनाने घेतला आहे.