नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा मांडत असताना जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचले. अजित पवारांनीकांदा निर्यात बंदीबद्दल माफी मागितली होती. त्याचा उल्लेख करत जयंत पाटलांनी अजित पवारांना नवे आव्हान दिले.
शिवस्वराज्य यात्रेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, जेव्हा शेतक-याकडे कांदा असतो. तेव्हा भाजप निर्यात बंदी करते. कांदा शेतक-याकडून व्यापा-याकडे गेला की, निर्यातीचे कर कमी करते, निर्यातबंदी उठवते. राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याने इथे येऊन माफी मागितली. आमची माफीची अपेक्षाच नाही अशी शब्दात जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले.
जयंत पाटील पुढे म्हणाले, त्यांनी (अजित पवार) ठामपणाने सांगावे की, भारतामध्ये शेतीमालाच्या निर्यातील आम्ही कधीही बंदी करणार नाही. एवढे त्यांनी मोदी साहेबांकडून काम करून घेतले ना, तरी जो खड्डा पडलाय त्यांच्यासाठी तो भरून निघेल. देशामध्ये राहू दे, पण एवढे जरी त्यांनी सांगितले की, कांदा निर्यातबंदी मोदींचे सरकार असेपर्यंत कधीही होऊ देणार नाही. आणि तशी लेखी ऑर्डर जर काढली. २०२९ पर्यंत नो निर्यात बंदी. कांद्यावर निर्यात शुल्क नाही, अशी गॅरंटी जर दिली, तर थोडा बहुत विश्वास ठेवता येईल असे जयंत पाटील म्हणाले.
शेतक-यांकडे ज्यावेळी कांदा असेल, त्यावेळी बरोबर निवडणुका झालेल्या असतील. निर्यात शुल्क लावायला दिल्ली मोकळी झालेली असेल. शेतक-यांना दाबून देशातील कांद्याची किंमत वाढू द्यायची नाही. पाकिस्तानातील कांदा दुसरीकडे महाग दराने विकला, तर चालतो. पण, आपला कांदा बाहेर जाऊ द्यायचा नाही. ही अशी मनात पाप असणारी प्रवृत्ती दिल्लीत पुन्हा नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधाराने जाऊन बसली अशी टीका जयंत पाटील यांनी केली.