मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवारांचा पराभव झाला. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीतून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांचा विजय झाला. शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तृमाने आणि भावना गवळी तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे विजयी झाले. महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर उभे असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सुरुवातीला काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. ११ जागांसाठीच्या निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिंिलद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावरून शेकापचे जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी एक्स या सोशल मिडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे की, विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी! सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन, महाराष्ट्र पाहतोय… लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. गम्मत म्हणजे कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती. तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय…? महाराष्ट्र पाहतोय. छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.