खोपट : प्रतिनिधी
लालपरी ही राज्याची जीवनवाहिनी आहे, आता एसटीचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहोत. राज्यातील सर्व एसटी डेपो एअरपोर्टप्रमाणे केले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खोपट येथील बस आगाराला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी महामंडळाची पुढील वाटचाल कशी असेल याचे सुतोवाच केले.
राज्यातील शहरी भाग आणि दुर्गम भागाला सोडणा-या एसटीचा कायापालट लवकरच होणार आहे. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीत मोठे बदल केले जाणार आहेत. दरम्यान, कर्नाटक राज्याच्या परिवहन सेवेची लांब पल्ल्याची गाड्याची सेवा जशी आहे, तशीच राज्यातील प्रवाशांना एसटी बसची सेवा दिली जाणार आहे, ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
कर्नाटक दौ-यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला सरनाईकांनी भेट दिली होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटीचा चेहरामोहरा बदलण्यात येणार तसेच राज्यातील परिवहनसेवा फाइव्ह स्टार केली जाणार असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील खोपट बस आगारात लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्यात आले.
खोपट आगाराचा पॅटर्न संपूर्ण राज्य भरातील आगारात राबवण्यात येईल. लालपरी ही राज्याची जीवन वाहिनी आहे. आता एसटीचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहोत. राज्यातील सर्व एसटी डेपो एअरपोर्टप्रमाणे तयार करण्यात येणार आहेत. सर्व एसटी डेपोत कॅश लेस हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.