22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूररेकॉर्डवरील चोरट्यांकडून १९ लाखांचे दागिने जप्त

रेकॉर्डवरील चोरट्यांकडून १९ लाखांचे दागिने जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सोलापूर : मागील वर्षभरात साथीदारांसोबत मंगळवेढा शहर, बठाण, मंद्रूप, मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, दोड्याळ, कोंडी, हिरज अशा ठिकाणी घरफोड्या करणा-या अशोक ऊर्फ आशिका-या छपरू काळे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण १९ लाख २८ हजार ५०० रुपयांचे जवळपास २८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना घरफोडीतील रेकॉर्डवरील अशोक ऊर्फ आशिका-या काळे मोहोळ येथे आल्याची खबर मिळाली. त्यानुसार गुन्हे पथकाने सापळा रचून अनगर परिसरातून त्यास पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली, त्यावेळी सात-आठ महिन्यांपूर्वी त्याने साथीदारांसोबत मंगळवेढा शहरात रात्री घरफोडी केल्याचे सांगितले. आशिका-या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध दाखल मंगळवेढा, टेंभुर्णी व सोलापूर तालुका पोलिस ठाण्यातील प्रत्येकी तीन, मोहोळ पोलिस ठाण्यातील चार, मंद्रूप पोलिसांतील एक तर अक्कलकोट उत्तर पोलिसांतील दोन, अशा एकूण १६ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, ख्वाजा मुजावर, राजेश गायकवाड, सहायक फौजदार नारायण गोलेकर, पोलिस हवालदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मोहिनी भोगे, सागर ढोरे-पाटील, अक्षय डोंगरे, यश देवकते, योगेश जाधव, समर्थ गाजरे, चालक समीर शेख यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

चोरीच्या पैशाच्या वाटणीवरून दोन खून केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आशिका-या काळे साथीदारांसह चोरी, घरफोडी करताना जवळ मोबाईल ठेवत नव्हते, बंद घरे त्यांचे टार्गेट असायचे. आशिका-या काही महिन्यांपूर्वी मोहोळमधील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. तो दिवसभर उसात झोपायचा आणि रात्री बाहेर यायचा. आशिका-या हा मूळचा कर्नाटकचा असून, तो अनेक वर्षांपासून भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथे राहायला होता. सतत तो ठिकाणे बदलून राहायचा. तो मोहोळमध्ये आला असल्याची खबर पोलिसांना लागली आणि वेशांतर करून पोलिस त्याचा शोध घेत होते. खासगी प्रवासी वाहनातून तो कुर्डुवाडीला जात असताना त्याला पुढे पोलिस असल्याचा संशय आला आणि चालू रिक्षातून उडी मारुन तो पळून जात होता. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर व सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला पकडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR