22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण, महायुतीच्या नेत्यांचा संताप!

भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण, महायुतीच्या नेत्यांचा संताप!

मुंबई : (प्रतिनिधी)
मनुस्मृतीचा निषेध करताना अनावधानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या घटनेवरून महायुतीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरले आहे. राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी आज आव्हाड यांची बाजू घेत त्यांचे समर्थन केल्याने महायुतीत मिठाचा खडा तर पडलाच आहे, पण भुजबळ थोरल्या पवारांकडे परतणार असल्याच्या चर्चेलाही जोर आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तिखट शब्दात टीका केली.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही श्लोक समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाचा जोरदार विरोध करताना, जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले होते. यावेळी अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर आव्हाड यांच्याकडून फाटले गेले. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. परंतु सत्ताधारी महायुतीने यावरून आव्हाड यांना घेरले आहे. पण आज अनपेक्षितपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ त्यांच्या मदतीला आले. भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली.

जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले होते. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना होती. रागाच्या भरात त्यांनी मनुस्मृती जाळली होती. त्यानंतर त्यांनी न बघताच चित्र फाडलं. आव्हाडानंतर इतर कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं अनुकरण केले. पण यावर त्यांनी माफीही मागितली. पण मुळ मुद्दा शिक्षणात मनुस्मृतीचा आहे. जितेंद्र आव्हाडांवर जी टीका करायची ती करा. परंतु जेव्हा तुम्ही मनुस्मृतीचा विरोध करता तेव्हाच तुम्हाला टीका करण्याचा अधिकार मिळतो. बहुजन समाजाला नको असलेल्या मनुस्मृतीला विरोधच केला पाहिजे आणि ती शालेय शिक्षणात येता कामा नये, ही माझीही भूमिका असल्याचे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.

भुजबळ यांच्या भूमिकेमुळे अजित पवार गटाची पंचाईत झाली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुदैवी असल्याचे सांगत त्यांना घरचा आहेर केला. आव्हाड यांच्या कृतीमुळे संपूर्ण देशाच्या संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आव्हाडांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुवून जाईल असे मला वाटत नाही. त्यांना प्रायश्चित घ्यावंच लागेल. भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल म्हणून पांिठबा देण्याचे वक्तव्य केले, हे अत्यंत दुदैवी आहे. त्यांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांनी केलेले कृत्य हे अत्यंत चुकीचे आहे, असे सांगण्याची आवश्यकता होती. पण भुजबळांनी जे केलंय अत्यंत दुदैवी असल्याचे मुश्रीफ म्हणाले. लोकसभा निवडणुकीत नाशिकची जागा अजित पवार गटाला न मिळाल्याने भुजबळ नाराज होते. निवडणूक प्रचारातही ते फारसे दिसले नाहीत. त्यामुळे भुजबळ थोरल्या पवारांकडे परतणार अशी कुजबूज काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांनी आव्हाडांची उघड पाठराखण केल्याने आता या चर्चेला आणखी जोर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR