नवी दिल्ली : मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल झाला असून काँग्रेस नेते जितू पटवारी यांच्याकडे मध्य प्रदेश काँग्रेसची कमान सोपवण्यात आली आहे. कमलनाथ यांच्या जागी काँग्रेसने युवा नेते जितू पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यातील पक्षाचे दुसरे प्रसिद्ध युवा नेते उमंग सिंगर यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंगर आता सभागृहातील विरोधी पक्षनेतेही असतील. या दोन्ही नेत्यांनी मध्य प्रदेशात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मोठ्या उत्साहात आयोजित केली होती.
पटवारी आणि उमंग हे दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या गटातील मानले जातात. मध्य प्रदेश निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात मोठे बदल होणार असल्याची चर्चा होती. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६६ तर भाजपला १६३ जागा मिळाल्या. निवडणुकीतील पराभवानंतर कमलनाथ यांनी पद सोडण्याची तयारी दर्शवली होती. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
महंत छत्तीसगडच्या विरोधी पक्षनेतेपदी
छत्तीसगडमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष चरणदास महंत यांना काँग्रेसने विरोधी पक्षनेता बनवले आहे. दीपक बैज यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपच्या आदिवासी सीएम कार्डला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने आदिवासी समाजातून विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष दोन्ही केले आहेत.