मुंबई : प्रतिनिधी
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या, रविवारी सरकारला ’जोडे मारा’ आंदोलन करणार आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आंदोलन केले जाणार आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाही उद्या निषेध आंदोलन करणार आहे.
सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. पंतप्रधान मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये पुतळ््याचे लोकार्पण केले होते. अवघ्या आठ महिन्यांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. लोकसभा निवडणूकीआधी श्रेय घेण्यासाठी घाईघाईने उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ््याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल या दुर्घटनेबद्दल माफी मागितली. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे नेते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन १ सप्टेंबर रोजी महायुती सरकारविरोधात ’जोडे मारा’ आंदोलनाची हाक दिली होती. उद्या, रविवारी सकाळी ११ च्या सुमारास हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून तिथून सगळेजण गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यासमोर जमणार आहेत. तेथे ‘सरकारला जोडे मारा’ हा कार्यक्रम केला जाणार आहे. सकाळी १० वाजता जोडे मारा आंदोलन केले जाणार आहे.
दरम्यान, आघाडीच्या आंदोलनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग येथील झालेली घटना दुर्देवी आहे. त्यासंदर्भात माफी देखील मागितली गेली आहे. तरीही आघाडीच्या आंदोलनाला उत्तर देत संधीसाधू नेत्यांचा उद्या, सकाळी ९ वाजता राज्यभरातून निषेध करणार असल्याची माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
आंदोलनाला अद्याप परवानगी नाही !
महाविकास आघाडी उद्या मुंबईत जोडे मारा आंदोलन करणार असली तरी शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांची या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र परवानगी मिळाली नाही तरी आंदोलन होणारच, असे ठणकावले आहे. मुंबई पोलिस, मिंधे सरकार आणि त्यांच्या पक्षातील पेशव्यांचे घाशीराम कोतवाल लोकभावनेचा उद्रेक दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.