मुंबई : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीच्या बुधवारी मुंबईत होणा-या संयुक्त सभेत, मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे विद्यमान महायुती सरकारला चले जावचा इशारा देत महासंग्रामाचे रणशिंग फुंकणार आहेत. मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या उपराजधानी नागपुर येथे ‘संविधान सन्मान संमेलन’ही होणार आहे.
जागावाटपाची मॅरेथॉन चर्चा, बंडखोरांची मनधरणी व उमेदवार अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधानसभेच्या महासंग्रामाचे रण सज्ज झाले असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा उद्या मुंबईत होत असून त्यात संघर्षाचा एल्गार होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत.
तर संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार आहे. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेत राहुल गांधी विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.
उद्याच्या सभेत काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर केल्या जाणार आहेत. काँग्रेस पक्ष या गॅरंटी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचवणार असून महायुतीच्या भ्रष्ट कराभाराबाबत जनजागृती करणार आहे. एकनाथ शिंदे-भाजपा-अजित पवार युती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे, तो परत आणावा लागेल. तसेच भाजपाच्या फेक नेरेटिव्हलाही चोख उत्तर दिले जाईल.
काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत गॅरंटी जाहीर केल्या व सरकार येताच त्याची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने कोणत्या गॅरंटी जाहीर केल्या व त्याची अंमलबजावणी कशी सुरु आहे हे वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला राज्यातील जनता बळी पडणार नाही असेही अतुल लोंढे म्हणाले.