मुंबई : गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मते दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करूनदेखील, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये ज्यांची मते दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झाले ते झाले आता पुढे काय ते बघूया.
आज मला खूप बोलायचे आहे. निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोन आले, नेमके आजच आले. याचा अर्थ मला समजतो. जरा जपून. गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या त्या सांगणे गरजेचे आहे असे राज ठाकरे म्हणाले.
मनसेचा गुढी पाडवा मेळावा आज पार पडला. ज्या नदीला आपण माता म्हणतो देवी म्हणतो. आजचे राज्यकर्ते नाहीत तर गेल्या अनेक वर्षांपासूनचे. गंगा साफ करावी हे राजीव गांधी यांनी म्हटले होते. तेव्हापासून गंगा साफ करत आहेत. मोदी पंतप्रधान झाले त्यांनीही तेच सांगितले. देशातल्या नद्यांची अशी अवस्था आहे, पाणी पिणे लांबची गोष्ट, अंघोळ केली तरी आजारी पडतात.
तिकडचेच लोक आलेले, त्यांनी सांगितले. आजारी पडणारच. प्रश्न गंगेच्या अपमानाचा नाही, कुंभमेळ्याचा नाही तर पाण्याच्या स्थितीचा आहे. तुम्ही वेगळ्या ठिकाणी जागा देऊ शकता. १६५ कोटी लोक आले म्हणतात म्हणजे अर्धा भारत. त्यातले व्हीव्हीआयपी पाण्यात गेले असतील बाकीचे काठावर बसले असतील. चीनची भिंत बांधता आली असती.
देशात एकूण ३११ नदीपट्टे आहेत. त्यापैकी ५५ नदीपट्टे प्रदुषित, सर्वात प्रदुषित असलेल्या नद्या उल्हास, मिठी, पवना, चंद्रभागा अशा सगळ्या महाराष्ट्रातील अत्यंत वाईट असा आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी वाईट आहे. मुंबईत पाच नद्या होत्या. त्यातल्या ४ मेल्या. म्हणजे मारल्या गेल्या. पाचवीही मिठी नदी मरायला आली आहे. त्या नदीची अवस्था मी काल शूट करायला सांगितली होती, असे राज ठाकरे म्हणाले. जे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत ते बंद करायचे आणि त्यावर बोललो की तुमचा धर्म आडवा येणार. धर्माच्या गोष्टी मला यांनी सांगूच नयेत, अशी टीका केली.