ठाणे : ठाण्यातील कल्याणमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आज मुख्य आरोपीला कोर्टासमोर हजर केले. त्यानंतर ठाणे कोर्टाने आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुख्य आरोपीचे नाव विशाल गवळी असे आहे. त्याला बुलडाण्यातून बुधवारी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सकाळी त्याला नौपाडा पोलिस ठाण्यात ठेवले होते, असे पोलिस अधिका-यांनी सांगितले आहे.
त्यानंतर त्याला आज कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
पोलिसांनी विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी गवळी आणि अन्य एका आरोपीला पोलिस ताब्यात घेतले आहे. त्यांचा या मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात सहभाग होता, असे पोलिसांनी सांगितले. कल्याण न्यायालयाने गुरुवारी साक्षीच्या पोलिस कोठडीत २ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. बँकेत नोकरी करणारी साक्षी गवळी ही विशालची तिसरी पत्नी आहे.
गुन्ह्यानंतर विशाल हा कल्याणमधील आधारवाडी चौकात दारूची बाटली खरेदी करताना दिसला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो बुलडाणा येथे पळून गेला. तिथून त्याला बुधवारी पकडण्यात आले. हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.