मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल होणार आहे. टीम इंडियाचे फिजिओ कमलेश जैन यांनी संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी बीसीसीआयकडे राजीनामा सोपवला आहे. कमलेश जैन यांच्याआधी सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनीही टीम इंडियाची साथ सोडली आहे.
क्रिकबझनुसार, कमलेश जैन सध्या नवी दिल्ली येथे टीम इंडियासोबत आहेत, जिथे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिन्ही सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, त्यांनी बीसीसीआयकडे आपला राजीनामा सोपवला आहे. बीसीसीआयने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश जैन सध्या तीन महिन्यांचा नोटीस पीरियड पूर्ण करत आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध होणा-या कसोटी मालिकेपर्यंत ते संघासोबत राहणार की त्याआधीच बीसीसीआय त्यांना रिलिव्ह करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संघाची साथ सोडण्यामागचं कारण काय?
चेन्नईचे रहिवासी असलेले कमलेश जैन यांनी नितिन पटेल यांची जागा घेत टीम इंडियाच्या फिजिओची जबाबदारी स्वीकारली होती. ते कोलकाता नाईट रायडर्सचाही भाग राहिले आहेत. दरम्यान, भारतीय संघातील खेळाडूंच्या सातत्याने होत असलेल्या दुखापतींच्या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापन त्यांच्यासोबत पुढे जाण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, कौटुंबिक जबाबदा-यांमुळे साडेचार वर्षांनंतर कमलेश जैन टीम इंडियाच्या फिजिओ पदाचा राजीनामा देणार असल्याचेही सांगितले जात आहे.
















