22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाकपिल परमारने इतिहास घडविला; ज्युदोमध्ये भारताला मिळवून दिले पहिले कांस्यपदक

कपिल परमारने इतिहास घडविला; ज्युदोमध्ये भारताला मिळवून दिले पहिले कांस्यपदक

पॅरिस : पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या कपिल परमारने इतिहास घडविला असून ज्युदोमध्ये भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले आहे.

कपिल परमारने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या जे१ गटातील कांस्यपदकाच्या लढतीत ब्राझिलच्या एलिएल्टन डी ऑलिव्हेएराचा १०-० असा सहज पराभव केला. पॅरालिम्पिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताला ज्युदोत आतापर्यंत एकही पदक जिंकता आले नव्हते. हा पराक्रम कपिलने करून दाखवला.

भोपाळच्या कपिल परमारने २०१९ मध्ये राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक, ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्णपदक, जागतिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक आणि २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले आहे. परमार हा मूळचा भोपाळचा आहे पण लखनौ येथील इंडियन पॅरा ज्युडो अकादमीमध्ये प्रशिक्षक मुनावर अंजार अली सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतो.

परमारला २००९ मध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी एक दुर्दैवी अपघाताचा सामना करावा लागला होता. घरासाठी पाणी आणण्याच्या प्रयत्नात मोटारीच्या विजेचा शॉक त्याला लागला होता. त्या अपघातामुळे त्याची बोटं एकमेकांचा चिकटली. त्याच्या डोळ्यांवर दीर्घकालीन परिणाम झाला आणि दृष्टीत अडथळा निर्माण झाला आणि जसजसे दिवस पुढे सरत गेले ही समस्या अधिक गंभीर होत गेली. हाय पॉवर चष्म्याने देखील त्याला मदत मिळाली नाही. पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला अंध भारतीय ज्युदोका आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR