परळी : परळीत शुक्रवारी शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. अपहरण करून एका टेकडीवर नेत त्याला पट्टा, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खूनाची दहशत अद्याप कायम आहे. त्यात पुन्हा एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण आणि तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी दिलेली धमकी यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आमदार सुरेश धस यांनी हे त्यांचेच लोक आहेत असे म्हणत वाल्मीक कराड गँगकडे बोट दाखवले आहे.
वाल्मीक कराड जेलमध्ये असला तरी त्यांची बी गँग परळी आणि बीड जिल्ह्यात अजूनही ऍक्टिव्ह आहेच. महाकालचे भस्म आणि कपाळावर गंध लावणारे हे त्यांचेच पोरं आहेत. शिवराज दिदवटेला मारहाण करत संतोष देशमुख पार्ट टू करण्याचाच त्याचा प्रयत्न होता, तसं त्यांनी बोलूनही दाखवले आहे. पण दिवटे थोडक्यात वाचला असे म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा परळीतील गँगवार आणि त्यांच्या आकांचा उल्लेख करत या प्रकरणातील आरोपी आणि वाल्मीक कराड गँगचे संबंध असल्याचे सूचित केले आहे.
शिवराज दिवटे याला अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न शुक्रवारी झाला. या मारहाणीचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिवाय दिवटे यांने आरोपींनी मारहाण करतांना तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकी दिल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आज बीड-परळी रोडवरील गोपीनाथ गड रस्त्यावर लिंबोटा ग्रामस्थांनी आरोपींवर मकोका लावण्याची मागणी करत रास्तारोको केला. तर मराठा संघटनांकडून बीड बंदची हाकही देण्यात आली.
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर भाष्य करताना आरोपींचे वाल्मीक कराड व इतर नेत्यांसोबत फोटो आल्याचा दावा केला. हे त्यांचेच लोक आहेत, वाल्मीक कराडी बी गँग जिल्ह्यात ऍक्टिव्ह आहे. शिवराज दिवटे याचा संतोष देशमुख होता होता राहिला, असे सांगत या महाकाल टोळीचा बंदोबस्त करावा लागेल, असेही धस म्हणाले.
काल धनंजय देशमुख शिवराज दिवटे याची अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. ही मारहाण आणि दिवटेला देण्यात आलेली धमकी हा गंभीर प्रकार आहे. ज्या आरोपींनी ही अमानुष मारहाण केली ते कोणाच्या जवळचे आहेत, हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे, असे सांगत धनंजय देशमुख यांनीही आरोपींचा वाल्मीक कराड गँगशी संबंध असल्याचे सूचक विधान केले होते. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी कोणत्या कोणत्या समाजाचे आहेत, हे सांगत याला जातीय रंग न देण्याचे आवाहन बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले होते.