बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. अशामध्ये हे प्रकरण लावून धरलेल्या भाजपचे बीडमधील आमदार सुरेश धस यांनी आणखी एक दावा केला आहे.
नुकतेच त्यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक दावे केले आहेत. ते म्हणाले की, वाल्मिक कराडच्या मुलाने पोलिसांना तब्बल दीडशे फोन केले, असा आरोप केला. तसेच, या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेत तो लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह ६ मोबाईल क्रमांकांवर अर्ध्या तासात १५० वेळा फोन केले होते. हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले? याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, वाल्मिक कराडला न्यायालयामधून तुरुंगात घेऊन जाताना त्याचा पीए कसा काळजी घेत होता? हेही दिसून आले आहे असेही ते म्हणाले. वाल्मिक कराडची मांजरसुंभा परिसरामध्ये २० ते २५ एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर ही जमीन आहे. कराडच्या सर्व संपत्तीबाबतची कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे, ही कागदपत्रे मी ईडीकडे देणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
आरोपींना लातूर तुरुंगात हलवावे
खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेने लातूर जिल्ह्यातील तुरुंगात हलवावे, असा अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, हे आरोपी त्यांना लातूरच्या तुरुंगात घेऊन जाण्याची मागणी का करत आहेत, याची माझ्याकडे माहिती आहे. पण जेव्हा याबाबतचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा मी सांगेन. पण या आरोपींना लातूर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील तुरुंगही नको, त्यांना विदर्भात ठेवा. कारण तिकडच्या तुरुंगाचे अधिकारी बदलत असतात असे विधान त्यांनी केले.