सातारा : सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू जागतिक वारसास्थळ असणा-या कास पुष्प पठारावर नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ लागल्याने येत्या आठ-दहा दिवसांत पावसाने उघडीप दिल्यास किंवा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्यास दहा ते पंधरा दिवसांनी फुलांच्या मुख्य बहराला प्रारंभ होईल. त्यामुळे वनसमितीची हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग सुरू झाल्याचे दिसत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सतत पडणा-या पाऊस आणि दाट धुक्यात कास पठार काहीसे लुप्त झाल्यासारखे वाटत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कास परिसरात पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने कास पठाराचे मनमोहक दृश्य दिसू लागले आहे. पांढ-या रंगाच्या चवर या फुलांनी कास पठार बहरले असून, काही ठिकाणी गालिचे पाहायला मिळत आहेत.
गेंद, तेरडा, सीतेची आसवे, टूथब्रश, नीलिमा, रानहळद आदी विविध दहा ते पंधरा जाती-प्रजातीच्या रंगीबेरंगी फुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ झाला असल्याने वनसमितीसह पर्यटकांना हंगामाची चाहूल लागली असून, वनसमितीची हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग सुरू झाली असून, वाहनतळ, स्वच्छता, रस्त्यात आलेली झुडपे हटविणे, खड्डे भरणे, हंगामासाठी कर्मचा-यांची नेमणूक करणे आदी कामे सुरू असून, उर्वरित नियोजन येत्या दहा-बारा दिवसांत पूर्ण करण्यात येईल.