पुणे : राज ठाकरेंविषयी आम्हाला प्रचंड आदर, या निवडणुकीमुळे त्यांना पाठिंबा देण्याची संधी आम्हाला मिळतेय. कथाकथित हिंदुत्ववादी पक्ष हिंदुचे कसं नुकसान करत आहेत त्याबाबत आम्ही १०० पापं असं पुस्तक छापणार आहोत. हिंदुंना गृहित धरू नका आणि हिंदूचे नुकसान करू नका असा संदेश कसब्यातून महाराष्ट्राला जाईल. यावेळी कसब्यात वेगळा निकाल लागेल असे सांगत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मनसेचे कसबा पेठेतील उमेदवार गणेश भोकरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
आनंद दवे यांनी म्हटले की, मंडल आयोग कुणी आणले, मंडल आयोगाचे समर्थन का केले, काश्मीरात हिंदू पंडितांची हत्या झाली तेव्हा तुम्ही सरकारचा पाठिंबा का काढला नाही आमच्याकडे १०० प्रश्न आहेत. आम्ही जाहीर सभेत हे प्रश्न विचारू. गणेश भोकरेसारखा सुशिक्षित तरूण उमेदवार मिळाला असेल तर कसब्याचाही गौरव होईल असे वाटते. आम्ही हिंदू महासंघ म्हणून गणेश भोकरे आणि मनसे यांच्यासोबत कसबा पेठेत नक्कीच मदतीला आहोत असे त्यांनी सांगितले.
तसेच निवडणुकीनंतर पक्षाच्या नेत्यांनी काय भूमिका घेतील हा त्यांचा विषय आहे. आमच्या हातात पुण्यातील ८ मतदारसंघातून चांगले उमेदवार निवडून जाणे. हिंदू म्हणून सांगणारे नव्हे तर ख-या अर्थाने हिंदुत्वाचे रक्षण करणारे उमेदवार निवडून जावेत. हिंदूंना घाबरवून ठेवणा-या पक्षांची पुन्हा राज्यात सत्ता येऊ नये अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले.
दरम्यान, कसब्यात भाजपाने जे उमेदवार दिलेत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. मला सातत्याने गोरक्षण संघटना, लिंगायत समाज, ब्राह्मण संघटना पाठिंबा देत आहे. मी सातत्याने करत असलेल्या या कामाचा गौरव आहे. आज हिंदू महासंघाने मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी ऋणी आहे. येणा-या निवडणुकीत कसबा पेठेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा फडकेल. मला आमदार नाही तर इमानदार व्हायचे आहे. ज्यांना भाजपाने उमेदवारी दिली ते ४ टर्म महापालिकेत होते, परंतु त्यांच्याकडे एकही काम दाखवण्याचे नाही. काँग्रेस आमदाराचीही हीच अवस्था आहे. मला जनतेचा सेवक व्हायचे आहे. वारे फिरले आहे ते मनसेच्या बाजूने फिरले आहे असा विश्वास मनसे उमेदवार गणेश भोकरे यांनी व्यक्त केला.