नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सूचक विधान केले आहे. काश्मीरचे नाव कश्यप असे होऊ शकते, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होते. सूफी, बौद्ध आणि शैल मठ सर्वांनी काश्मीरमध्ये चांगल्या पद्धतीने विकास केला आहे.
त्यांनी सांगितले की, कलम ३७० आणि ३५ए देशाला एक होण्यापासून रोखण्याच्या तरतुदी होत्या. संविधानसभेत या कलमांना बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे ही कलमे तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर या कलंकित अध्यायाला मोदी सरकारने हटवलं आणि विकासाचे रस्ते उघडले. अमित शाह पुढे म्हणाले की, कमल ३७० नेच काश्मीरमधील तरुणांमध्ये फुटीरतावादाची बिजे रोवली. कलम ३७० ने भारत आणि काश्मीरमधील एकोप्याला तोडले. त्यामुळे काश्मीर खो-यात दहशतवाद बोकाळला. मात्र आता कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी कारवाया घटल्या आहेत.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील असेही अमित शाह यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी सांगितले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता. मात्र तो अडथळाही आता हटवण्यात आला आहे. काश्मीरमध्ये जी मंदिरे मिळाली आहेत, त्यांचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे, त्यामधून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दर्शवते. लडाखमध्ये तोडण्यात आलेली मंदिरे, काश्मीरमध्ये संस्कृत भाषेचा होत असलेला वापर, काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या चुका या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे असेही अमित शाह यांनी सांगितले.