मुंबई : प्रतिनिधी
भाजप, मनसे, शिंदेच्या शिवसेनेपाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने ६५ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आज ठाकरे गटाने उमेदवार घोषित केले असून, मुंबईत बहुतांश ठिकाणी ठाकरेविरुद्ध शिंदे गट यांच्यातच थेट लढत होणार आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी-पाचपखाडी मतदारसंघात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव करत ठाणेदार असल्याचे दाखवून दिले. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात होती. त्यातच ठाणे शहरमधून माजी खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी- पाचपखाडी मतदारसंघातून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच ओवळा माजीवडामधून नरेश मणेरा, ऐरोलीमधून एम. के. मडवी, भिवंडी ग्रामीणमधून महादेव घाटळ, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, अंबरनाथमधून राजेश वानखेडे, डोंबिवलीमधून दीपेश म्हात्रे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली. त्यामुळे मुंबई, ठाण्यात ठाकरे यांना सोडून गेलेल्या आमदारांसोबत लढत रंगणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
मुंबईत ठाकरे गटाचे १३ उमेदवार जाहीर
मुंबईत १३ मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने १५ पैकी १४ आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीत स्थान दिले. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे येथून अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स कायम आहे.