28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकेजरीवालांचा ईडी कार्यालयात जाण्यास नकार; निवडणूक प्रचारासाठी रवाना

केजरीवालांचा ईडी कार्यालयात जाण्यास नकार; निवडणूक प्रचारासाठी रवाना

इंदूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी सकाळी कथित मद्य घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ईडी कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी त्यांच्याविरुद्धचे समन्स बेकायदेशीर असून ते रद्द करण्याची मागणीही केली. त्यानंतर काही तासांनी ते मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारासाठी रवाना झाले. सिंगरौली येथे आयोजित सभेत त्यांनी दावा केला की, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मला अटक होऊ शकते. त्यांनी आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. अरविंद केजरीवाल यांनी मध्य प्रदेशातील सिंगरौली विधानसभा मतदारसंघात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत रोड शोही केला.

एका जाहीर सभेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, ते (भाजप) दिल्लीत उभे राहून केजरीवालांना अटक करू, अशी धमकी देत ​​आहेत. त्यांनी आम्हाला अटक केली तर हरकत नाही, केजरीवाल तुरुंगात जायला घाबरत नाही. केजरीवाल यांच्या शरीराला तुम्ही अटक कराल का पण केजरीवालांच्या विचारांना अटक कशी करणार? तुम्ही या एका केजरीवालला अटक कराल. हजारो, लाखो, करोडो केजरीवालांना तुम्ही कसे अटक कराल? असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी येतील, त्यादिवशी मी तुरुंगात असेल की बाहेर, मला माहीत नाही. पण मी कुठेही असलो तरी मला ऐकू येईल की, सिंगरौलीच्या लोकांनी त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR