मुंबई : ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. खालिद का शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामधील काही संवादांवर हिंदुत्त्ववादी संघटनांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते.
चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याबाबत पत्र लिहिले होते. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य खात्याकडून फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिवलसाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता. खालिद का शिवाजी या चित्रपटाचे प्रदर्शन ८ ऑगस्ट रोजी होणार होते. मात्र, हिंदुत्त्ववादी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिले त्यानुसार आज दुपारनंतर साडे चार वाजता दिग्दर्शकांना त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे.
ऐतिहासिक चुकांबाबत परीक्षण : शेलार
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील याबाबत ट्विट केले आहे, ते म्हणाले, चित्रपट ‘खालिद का शिवाजी’ याचे प्रदर्शन माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांनी एक महिन्यासाठी स्थगित केले आहे. हे स्थगन महाराष्ट्र सरकारकडून चित्रपटातील ऐतिहासिक चुकीबाबत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर होऊ शकणा-या संभाव्य परिणामाबाबत व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेऊन करण्यात आले आहे.