वॉशिंग्टन : भारताचे अमेरिकेतील राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्यावर रविवारी खलिस्तानी निदर्शकांच्या गटाने एका गुरुद्वाऱ्यात धक्काबुक्की केली. तरनजीत सिंग संधू गुरुपर्वाच्या मुहूर्तावर नमन करण्यासाठी लाँग आयलंडमधील हिक्सविले गुरुद्वारात पोहोचले होते. दरम्यान, आंदोलकांनी त्यांना घेराव घालून घोषणाबाजी सुरू केली. आंदोलकांनी त्यांच्यावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला.
भारतीय राजदूत आणि खलिस्तानी समर्थकांच्या संभाषणाचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. व्हीडीओच्या सुरुवातीला राजदूत आंदोलकांना सांगतांना की, ते गुरुदवाऱ्यात सेवेसाठी आले आहेत. एक खलिस्तानी समर्थक त्यांना म्हणतो की, हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसाठी तुम्हीच जबाबदार आहात, तुम्ही पन्नूच्या हत्येचा कट रचला होता. व्हीडीओमध्ये इतर लोक परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आंदोलक भारतीय राजदूत संधू यांना विचारत आहेत की, तुम्ही उत्तर का देत नाही?
भारतीय राजदूताने सोशल मीडियावर गुरुदवाऱ्याला भेट दिल्याचा उल्लेख केला. मात्र, त्यांच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीचा उल्लेख त्यांनी केला नाही. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, गुरुपूरब साजरा करण्यासाठी लॉंग आयलंडमधील गुरू नानक दरबारमध्ये उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभले. येथे गुरू नानक यांच्या एकता आणि समानतेच्या चिरंतन संदेशाबद्दल ऐकले.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरची कॅनडातील ब्रिटिश कोलंबियात पार्किंगमध्ये काही मुखवटाधारी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेच्या काही महिन्यांनंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येमध्ये भारतीय एजंटची भूमिका असल्याचा आरोप केला होता. भारताने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या प्रकरणावर म्हणाले होते की, भारत कोणत्याही तपासाला नकार देत नाही, परंतु कॅनडाने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे द्यावेत अशी आमची इच्छा आहे.