खान्देश म्हणजे उत्तर महाराष्ट्र अलिकडे भाजपचा गड म्हणून ओळखला जात आहे. एकेकाळी हा काँग्रेसचा गड होता. परंतु काँग्रेस आघाडीतीलच काही नेते भाजपात गेले. त्यामुळे या भागात भाजपची ताकद वाढली. मात्र, लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून अनेक ठिकाणी धुसफूस आहे. कुठे भाजप नेते नाराज, तर कुठे शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते अस्वस्थ आहेत. या वाढत्या अस्वस्थतेमुळे थेट उमेदवारांचीच गोची होत असून, ही अस्वस्थता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडल्यास या निवडणुकीत खान्देशात फार मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते.
राज्यात लोकसभेच्या ५ टप्प्यांत निवडणुका होत आहेत. यापैकी २ टप्प्यांतील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता तिस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यातच महाविकास आघाडीचे जागावाटप झाले आहे. मात्र, काही जागांवरील उमेदवार घोषित करणे बाकी आहे. मात्र, महायुतीत अजूनही दोन ते तीन जागांवरून टोकाचे मतभेद कायम आहे. त्यात प्रमुख तिन्ही पक्षांत एकवाक्यता होताना दिसत नाही. त्याचा फटकादेखील महायुतीलाच बसण्याची शक्यता आहे. त्यातच पुढील काळात प्रचाराची राळ चांगलीच उठणार आहे. त्यात आक्रमक प्रचार झाला आणि विरोधकांची एकजूट झाली, तर सत्ताधारी महायुतीच्या तोंडचे पाणी पळू शकते. कारण शरद पवार यांनी तशी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. अलिकडे गिरीश महाजन यांनी या दोन्ही मतदारसंघांत आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे जळगावमध्ये पक्षात त्यांच्याशिवाय पान हालत नाही. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या म्हणण्यानुसार विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापली आणि ही चूक त्यांना चांगलीच महागात पडली. कारण सुरुवातीला शांत, संयमी भूमिका घेणा-या उन्मेष पाटील यांनी आपले मित्र, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना साथीला घेतले आणि ठाकरे गटाची त्यांना थेट लोकसभेची उमेदवारीच मिळवून दिली. त्यामुळे जळगावात कमकुवत वाटणा-या ठाकरे गटाची मोठी ताकद वाढली. एवढेच नव्हे, तर भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासमोर आता तगडे आव्हान उभा ठाकले.
दुसरीकडे रावेर मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली. उमेदवारी घोषित होईपर्यंत खडसे राष्ट्रवादीमधून रावेर येथून लढण्याची भाषा करीत होते. या माध्यमातून त्यांनी भाजपवर दबाव वाढविला आणि जेव्हा भाजपने एक पाऊल मागे घेत रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हा खडसे यांनी स्नुषाच्या विरोधात भूमिका घेण्याऐवजी भाजपला पूरक भूमिका घ्यायला सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ खडसे यांनी आपल्या स्नुषा रक्षा खडसे यांची उमेदवारी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. जर रक्षा यांना भाजपाने उमेदवारी दिली नसती, तर राष्ट्रवादीच्या गोटातून त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला असता. पण रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होताच ते अधिक सक्रिय झाले आणि भाजपमध्ये जाण्याचा मार्गही खुला करून घेतला. मात्र, गिरीश महाजन रोज त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या दोन भाजप नेत्यांमधील वाद टोकाला जाऊ शकतो.
धुळ्यातील भाजपाची परिस्थिती नाशिक लोकसभेच्या समीकरणांवर अवलंबून आहे. छगन भुजबळ यांच्या संदर्भातील नाशिकचा निर्णय अजून झालेला नाही. शिवसेना शिंदे गटाची उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जागा हातून गेल्यास धुळ्यासाठी शिंदेंचे समर्थक आग्रही आहेत. त्यामुळे उमेदवारी बदलाबदलीऐवजी मतदारसंघ बदलाचा विचार होऊ शकतो का, याचाही कयास लावला जात आहे. त्यातून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान, धुळ्यात सुभाष भामरे यांना अगोदरच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आघाडीत काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु बच्छाव यांना विरोध आहे. त्यामुळे यातून काँग्रेस नेते कसा मार्ग काढतात, यावर ब-याच गोष्टी अवलंबून आहेत.
नंदुरबारमध्ये हीना
गावितांसमोर आव्हान
नंदुरबारमध्ये विद्यमान खासदार हीना गावित यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्यासाठी ही वाटचाल बिकट आहे. शिंदेंची शिवसेना त्यांचे काम करण्यासाठी इच्छुक नाही. अन्यही बरेच गट नाराज आहेत. पर्यायाने पाडवी पुत्राकडे नाराज गट गेल्यास हादरे वाढू शकतात. एकूणच कमी-अधिक प्रमाणात खान्देशातील मतदारसंघांमध्ये राजकीय उलथापालथीचा वेग वाढल्यास बराच विपरित परिणाम होऊ शकतो.