नाशिक : गुरूवारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र या सभेचा मंडप अचानक उडाला. यामुळे दोन कार्यकर्ते जखमी झाले.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हिरामण खोसकर यांना अजित पवार गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून महाविकास आघाडीकडून काँग्रेसने लकी जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
वादळामुळे उडाला मंडप
लकी जाधव यांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या सभेसाठी उभारण्यात आलेला मंडप वादळामुळे अचानक उडाला. सभा मंडप उडाल्यामुळे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. तर मंडप उडाल्यामुळे सभास्थळी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. हेलिपॅडवरून निघालेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांचा ताफा पुन्हा माघारी परतला. यानंतर मल्लिकार्जुन खर्गे पुन्हा सभा स्थळी दाखल झाले.