18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रयूपीएसीचे प्रयत्न संपल्यावरही दोन वेळा दिली खेडकर यांनी परीक्षा

यूपीएसीचे प्रयत्न संपल्यावरही दोन वेळा दिली खेडकर यांनी परीक्षा

 नवा कारनामा समोर; धक्कादायक माहिती उघड

मुंबई : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यूपीएससीचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी आपल्या नावात बदल केला आणि परीक्षा दिली आहे. त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोनवेळा परीक्षा दिली आहे. सर्वसामान्यपणे पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून ९ वेळा परीक्षा देता येत होती. पण, त्यांनी नावात बदल करून तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे. नव्या खुलाशामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. याशिवाय यूपीएससी परीक्षेबाबत अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. परीक्षेची तयारी करणा-या लाखो उमेदवारांसाठी ही धक्क्याची बाब आहे.

पूजा खेडकर यांच्या असाधारण मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांचे पाय खोलात जात असल्याचे चित्र आहे. कारण, पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली आहे. शिवाय पीएमओने पूजा खेडकर यांचा अहवाल देखील मागवल्याची माहिती आहे. याप्रकरणी तपास सुरु असून काही अनियमितता आढळून आल्यास पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

आई-वडिलांविरोधातही गुन्हा दाखल
खेडकर यांनी नगरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचे सर्टिफिकेट घेतले आहे. बहुनेत्र दोष आणि मानसिक आजार याबाबत त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले होते. याचा फायदा घेऊन त्यांनी बहुविकलांगता कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे त्यांचे हे सर्टिफिकेट देखील वादाच्या भोव-यात आहे. याप्रकरणी तपास केला जात असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR