संभाजीनगर/खुलताबाद : प्रतिनिधी
खुलताबाद येथील औरंगजेब कबर परिसरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन चोहोबाजूंनी खबरदारी घेत आहे. कबरीला तीनस्तरीय सुरक्षा कवच दिले आहे. तसेच खुलताबाद शहर आणि जवळपासच्या गावांमधील अंडरकरंटची माहिती मिळावी, यासाठी खासगी व्यक्तींची (हेर) नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
खुलताबाद शहरातील औरंगजेबाची कबर संरक्षित स्मारक असून, ती केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे या कबरीला संरक्षण आहे. मात्र, काही सामाजिक संघटनांकडून कबर उखडून टाकण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कबरीच्या आजूबाजूला असलेल्या लोखंडी ग्रील्स सुरळीत आहेत की नाही, हे पाहण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले.
कबरी भोवती लोखंडी सुरक्षा कवच
येथील औरंगजेबची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर वाद निर्माण झाल्याने एकीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला असताना कबरीच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून आत कोणीही जाऊ नये, यासाठी लोखंडी अँगलला पत्रे मारण्यात आले. या माध्यमातून कबरीचे सुरक्षा कवच वाढविण्यात आले आहे. मुघल सम्राट औरंगजेबचे गुरू सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात बाजूलाच औरंगजेबांची कबर आहे.
एक महिना विशेष बंदोबस्त
जिल्ह्यातील खुलताबाद शहर व औरंगजेबाची कबर असलेला परिसर १८ एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेड झोन म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. या कालावधीदरम्यान पूर्ण खुलताबाद शहर हद्द व औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे स्वयंचलित ड्रोन उडविण्यास बंदी असणार आहे. १ महिन्यापर्यंत तो सगळा परिसर सुरक्षेच्या निगराणीत असणार आहे.