25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसीमेवरी शहीद जवानांची हत्या

सीमेवरी शहीद जवानांची हत्या

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला असून यात पाच जवान शहीद तर पाच जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करत ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, पण दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते तेव्हाही जम्मू-कश्मीरमध्ये जवानांवर हल्ले झाले आणि त्यात जवान शहीद झाले. देशाचे गृहमंत्री अमित शाह या देशाला भ्रमित करत आहेत. खोटे बोलत आहेत की, जम्मू-काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे शांतता नांदते. परंतु, अनुच्छेद ३७० हटवल्यापासून जम्मू कश्मीरमध्ये अधिक अस्थिरता आणि अशांतता निर्माण झाली आहे, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला.

जम्मू-काश्मीरच्या विधानसभेला अद्याप टाळे लागलेला आहे. जम्मू-कश्मीरच्या निवडणुका अद्याप होऊ शकल्या नाहीत, हे कसले लक्षण आहे, असा सवाल करत, देशाचे प्रधानमंत्री परदेश दौ-यावर आहेत, शपथ घेतल्यापासून ते कधी इटलीला असतात, कधी रशियाला असतात आणि देशातले आमचे जवान येथे शहीद होत आहेत. मणिपूर आणि जम्मू कश्मीर हे दोन्ही राज्य जणू भारताच्या नकाशावर नाहीत अशा पद्धतीने देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री काम करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.

देशाचे पंतप्रधान परदेश दौ-यावर जातात. महाराष्ट्रात दहावेळा येतात. परंतु, मणिपूर आणि जम्मू-काश्मीरला जात नाहीत. ही दोन राज्ये भारताचा भाग नाहीत का, अशी विचारणा करत, जे पाच जवान शहीद झाले, त्यांना कीर्ती चक्र, अशोक चक्र तुम्ही प्रदान करा. परंतु, शेवटी बलिदान नसून या हत्या आहेत. या हत्यांना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंग जबाबदार आहेत, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, पुलवामामध्ये ४० जवान शहीद झाले ते का शहीद झाले त्याचा तपास अद्याप लागू शकला नाही. आरडीएक्स कुठून आले, ४०० किलो आरडीएक्स पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आले हे कुठून आले, हा शोध हे अद्याप लावू शकत नाही ते देशावर राज्य करत आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR