पाँगयाँग : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांनी अखेर आपला उत्तराधिकारी निवडला आहे. किम जोंग उन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून आपली मुलगी जू एची निवड केली आहे. दक्षिण कोरियाचा गुप्तचर विभाग नॅशनल इंटिलेजन्स सर्व्हिसच्या अधिका-यांनी आज दक्षिण कोरियांच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. एनआयएसने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांनी आपल्या मुलीच्या नावाची घोषणा उत्तराधिकारी म्हणून केली आहे.
किम जोंग उन यांनी उत्तराधिकारी म्हणून मुलीच्या नावाची घोषणा करताच तिच्या प्रशिक्षणाला देखील सुरुवात झाली आहे, ती आता किम जोंग उन यांची जागा घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे, याचाच अर्थ आता किम कुटुंबातील चौथी पिढी उत्तर कोरियामध्ये सत्तेत येणार आहे.
कोण आहे किम जोंग यांची मुलगी जू?
किम जोंग यांची मुलगी किम जू ए बाबत खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. समोर आलेल्या माहितीनुसार किम जू ए चे वय अवघे १३ वर्ष इतके आहे, तिचा जन्म २०१३ साली झाला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये ती पहिल्यांदाच जगासमोर आली. ज्यावेळी उत्तर कोरियाने एका लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची टेस्ट केली होती. त्यानंतर ती अनेकदा आपले वडील किम जोंग उन यांच्यासोबत दिसली. तिने अनेक कार्यक्रमांमध्ये आपले वडील किंम जोंग उन यांच्यासोबत हजेरी लावली आहे. तसेच तीच्या हस्ते उत्तर कोरियामध्ये अनेक विकास कामांचे उद्घाटन देखील झाले आहे. विविध क्षेपणास्त्रांची टेस्ट, उत्तर कोरियाच्या सैन्याची परेड अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला देखील ती नियमीतपणे उपस्थित राहते.

