मुंबई : कोल्हापूर आणि साता-यातील छत्रपतींची गादी हा महाराष्ट्रातील काळजाचा विषय आहे. कोल्हापुरातील व्यक्तीला विरोध करताना सरळसरळ त्या गादीचाच अपमान केला आहे. ही अत्यंत वाईट आणि घृणास्पद गोष्ट आहे. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेने त्यांचा पराभव केला. पण त्यावेळी त्या गादीचा अवमान होईल असा एक शब्दही कुणी बोलले नव्हते. छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही, असे रोखठोक मत अभिनेते किरण माने यांनी व्यक्त केले आहे.
महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांवर टीका करताना, आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही-आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. मंडलिकांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटायला लागले असून, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात अभिनेता किरण माने यांनीही आपल्या भावना सोशल मीडियातून व्यक्त करत त्यांना धारेवर धरले आहे.
अभिनेते किरण माने नेहमी विविध राजकीय मुद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. आता किरण माने यांनी छत्रपतींच्या कोल्हापूर आणि सातारा गादीविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. किरण माने यांनी काही तासांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शाहू महाराज छत्रपती यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी छत्रपतींच्या कोल्हापूर आणि सातारा गादीचा अपमान करणा-यांना खडे बोल सुनावले आहेत.