सातारा : दूध दराच्या मुद्यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. किसान सभेने देखील आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे.
दरम्यान, दुधाला ३४ रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीने शासन आदेश काढला होता. मात्र, हा शासन आदेश राज्यातील दूध संघ आणि दूध कंपन्यांनी धुडकावला आहे. त्यामुळे दुधाचे भाव हे ३४ रुपयांवरून २७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. याविरोधात राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये आज सकाळी दूध संकलन केंद्रांवर आदेशाची होळी करून हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात दूध संघ आणि कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाच्या चढ-उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपवण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खासगी आणि सहकारी दूध संघांचे दूध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्यांनी दूध खरेदी दर ठरवावेत. दूध संघांनी आणि कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले होते. यानुसार दुधाला ३४ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दूध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच धाब्यावर बसवण्यात आला असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले.
मागणी वाढली असताना दर वाढणे गरजेचे
दुष्काळ असल्याने दुधाचे उत्पादन घटले आहे. अशा स्थितीत मागणी-पुरवठ्याचे गणित पाहता दूध दर वाढायला पाहिजे होते. मात्र, याउलट मागणी कमी आणि उत्पादन अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दूध कंपन्यांचा हा दर पाडण्यासाठी केलेला कांगावा आहे. शिवाय यासोबतच राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली बनावट दूधनिर्मिती हेही दर कोसळण्यामागचे एक मोठे कारण आहे.
किसान सभेने नोंदविला निषेध
राज्यातील विविध ठिकाणी आज शासनाने दूध दराबाबत काढलेल्या आदेशाची होळी केली. डॉ. अजित नवले यांनी देखील दुधाला दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे सांगितले. आज सरकारच्या या आदेशाची किसान सभा आणि दूध उत्पादकांनी होळी करत सरकारचा निषेध केला.
निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज :
राधाकृष्ण विखे-पाटील
दूध दराबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असे म्हटले. विखे म्हणाले, सध्या दुधाची आवक प्रचंड आहे. पूर्वी दूध पावडर किंवा बटरमध्ये कन्वर्जन करायचे. त्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्यामुळे त्याची निर्यात पूर्णपणे ठप्प आहे. निर्यातीला जर आपण प्रोत्साहन देऊ शकलो आणि कन्वर्जनला जर संधी मिळाली तर भाव वाढण्यात मदत होईल. सोबतच भेसळ दुधासंदर्भात कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दूध दर वाढीसाठी मदत होईल अशी आशा विखेंनी व्यक्त केली.