कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारा तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर आता तुरुंगाबाहेर आला आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. आता तो कळंबा तुरुंगातून बाहेर आला. कोरटकरला असलेला धोका लक्षात घेता पोलिसांच्या सुरक्षेमध्ये त्याला नागपूरच्या घरी पोहोचवण्यात येणार आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून प्रशांत कोरटकरने धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याच प्रकरणात प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोरटकरला सुरुवातीला पाच दिवस पोलिस कोठडी तर नंतर १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी कोरटकरला जामीन मिळाला होता. पण न्यायालयीन प्रक्रिया आणि एका दिवसाची सुटी असल्याने कोरटकरचा मुक्काम वाढला होता. आता कोरटकरला तुरुंगाबाहेर काढण्यात आले आहे.
पोलिस सुरक्षेत नागपूरपर्यंत पोहोचवणार?
प्रशांत कोरटकरच्या जीवाला धोका असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता. कोरटकरला पोलिस सुरक्षेमध्ये नागपूरपर्यंत पोहोचवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली होती. न्यायालयाने ती मागणी मंजूर केली. प्रशांत कोरटकरला आता पोलिस सुरक्षेमध्ये नागपूरच्या घरी पोहोचवण्यात येणार आहे.