नवी दिल्ली : वारंवार पक्षाच्या विरोधात भाष्य करणा-या आचार्य प्रमोद कृष्णन यांना तात्काळ प्रभावानं सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. कृष्णन यांच्याविरोधात अनेक तक्रारी पक्षश्रेष्टींकडं दाखल झाल्या होत्या त्याला अनुसरुन ही कारवाई करण्यात आल्याचे यूपी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
२०१९ मध्ये आचार्य प्रमोद कृष्णन यांनी लखनौच्या जागेवरुन लोकसभा निवडणूक लढवली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ते वारंवार काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेसच्या धोरणांविरोधात भूमिका घेत होते. त्यामुळं ते येत्या काळात काँग्रेसपासून फारकत घेतील असंही बोलले जात होते. त्यांनी असा निर्णय घेण्यापूर्वीच पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. आचार्य प्रमोद कृष्णन यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपचं समर्थन केले होते. याशिवाय १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी कल्की धाम मंदिराच्या शिलान्यासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निमंत्रित केले होते. नुकतेच ते राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला देखील हजर राहिले होते.