वॉशिंग्टन : काश्मिरी वंशाच्या भारतीय-अमेरिकन महिला क्रिस्टल कौल यांनी अमेरिकेच्या संसदेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या व्हर्जिनिया जिल्ह्यातून काँग्रेस प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवणार आहेत. क्रिस्टल कौल या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा तज्ञ आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सार्वजनिक सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या मुख्य मुद्द्यांवर त्या लक्ष केंद्रित करणार आहेत.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सांगितले की, किशोरवयात त्यांनी त्यांच्या वडिलांकडून अनेकदा काश्मीरमधील संघर्षाच्या कथा ऐकल्या आहेत. हा तोच काळ होता जेंव्हा माझे वडील मला काश्मीरमधील तणावाविषयी सांगायचे. मला काश्मीरबद्दल अधिक जाणून घेण्यात खूप रस होता. तेथील संघर्ष समजून घेण्यावर मी माझे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले होते. कौल या निवडणुकीत विजयी झाल्यास काँग्रेसच्या प्रमिला जयपाल यांच्यानंतर प्रतिनिधीगृहात निवडून आलेल्या त्या दुसऱ्या भारतीय-अमेरिकन महिला असतील. कौल यांना हिंदी, पंजाबी, दारी, उर्दू आणि अरबी अशा आठ भाषांवर प्रभुत्व आहे आणि काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या काश्मीर वंशाच्या पहिल्या महिला आहेत.