35.1 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रउन्हाळ्यात प्रवास होणार ‘कुल-कुल’

उन्हाळ्यात प्रवास होणार ‘कुल-कुल’

राज्यभरात एकूण ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. ग्रामीण भागात जाणा-या प्रवाशांना गारवायुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी दर महिन्याला ३०० नव्या वातानुकूलित बस सेवेत दाखल होणार आहेत.

दरम्यान, उन्हाळी सुट्या सुरू होताच अनेक चिमुकल्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना गावी जाण्याचे वेध लागतात. या काळात एसटी महामंडळावर प्रचंड प्रवासी लोटतो. यंदा या वाढलेल्या मागणीला सामोरे जाण्यासाठी एसटी महामंडळाने ८७२ वातानुकूलित शिवशाही बसेस मार्गावर धावणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये कोकण, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, नागपूर, जळगाव, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल.
मुंबई सेंट्रल आणि परळ आगारातूनही विशेष अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत परवडणा-या दरात आणि आरामदायक प्रवासाची संधी या माध्यमातून मिळणार आहे. अशा प्रकारे एसटी महामंडळाला उत्पन्नातही चांगली भर पडण्याची शक्यता आहे.

दर महिन्याला ३०० नव्या एसी बस सहभागी
राज्य शासनाने २६४० नवीन एसी एसटी बसेस लवकरच सेवा पुरवण्यासाठी टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्यात ३०० नव्या बसेस ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे गावागावांतील नागरिकांना आता वातानुकूलित सुविधांसह प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी यासंदर्भात माहिती दिली.

सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे प्रवासी अधिकाधिक एसी बसच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे. शिवाय शाळांना लागलेल्या सुट्यांमुळे मुंबई आणि उपनगरातून कोकण व इतर भागांत जाणा-या चाकरमान्यांनाही या सुविधा दिलासा देतील.

मुंबई सेंट्रल आगारातूनही अतिरिक्त गाड्या
नव्या धोरणानुसार सोडण्यात येणा-या एसी बस या मध्यम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश असणार आहे. मुंबई सेंट्रल व परळ आगारातूनही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिवशाही बसची सेवा मुंबईतून राज्यभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव, बीड, नागपूर, अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी सुरू राहणार आहे.

लवकरच २६४० नवीन एसी गाड्या
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नजीकच्या काळात २६४० नवीन ‘लाल परी’ गाड्या दाखल होणार आहेत. दर महिन्याला ३०० गाड्या अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने नवीन एसी लाल परी प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. राज्याच्या खेड्यापाड्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR