27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रकुणाल कामरा प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद

कुणाल कामरा प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद

महायुतीच्या आमदारांची कारवाईची मागणी विडंबनेला विरोध नाही : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख असलेली कविता सादर केल्याने संतप्त शिवसैनिकांनी रात्री एका हॉटेलची तोडफोड केली होती. विधिमंडळातही आज याची प्रतिक्रिया उमटली. कुणाल कामरावर कारवाई करावी यासाठी आक्रमक झालेल्या शिवसेना भाजप सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज काही काळ थांबवावे लागले. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, केवळ राजकीय व्यंग असेल तर आम्हीसुद्धा टाळया वाजवून दाद देऊ, पण कोणी सुपा-या घेउन बदनामी करत असेल तर मात्र सोडणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे इशारा दिला. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्याला मर्यादा आहेत. कोणाला अपमानित करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही असेही फडणवीस यांनी बजावले.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. विधानसभेत अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित करताना म्हटले, संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. पण त्यात सांगितले आहे की काही बंधने पाळली पाहिजेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत या कामराने काही टिप्पण्या केल्या आहेत. एकनाथ शिंदे हे लोकनेते आहेत. पंतप्रधानांनी देखील कष्टाळू मुख्यमंत्री मागच्या काळात मिळाला असा त्यांचा गौरव केला.

शरद पवार यांनी देखील त्यांच्या कार्यक्षमतेचे जाहीररित्या कौतुक केले आहे. या कामराने हिंदू देवीदेवतांचा अपमान केला. सर्वोच्च न्यायालयाबद्दल देखील अभद्र टिप्पणी करण्यापर्यंतची मजल गेली होती. त्याच्यावर दोन विमान कंपन्यांनी बंदी घातली होती. त्याच्या मुसक्या आवळल्या नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्याला वेळीच आवरा. कोणी कॉमेडीच्या नावावर इतर पक्षाकडून सुपा-या घेउन राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कामरा करतो. याचा बोलविता धनी कोण याचा शोध घ्यावा लागेल. खरा सूत्रधार शोधावा लागेल. त्याला जोपर्यंत जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत मास्टरमाईंड कळणार नाही असे खोतकर म्हणाले. यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले. यामुळे कामकाज पाच मिनिटांकरिता विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तहकूब केले.

सुपा-या घेऊन बदनामी करणा-यांना सोडणार नाही : फडणवीस
सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणी मतांची अभिव्यक्ती करूच नये असे कोणाचेही म्हणणे नाही. आम्ही हास्य व्यंगाचा पुरस्कार करणारे आहोत. राजकीय व्यंग असले तरी त्याला दुसरा रंग देण्याचा आपण प्रयत्न करत नाही. पण अभिव्यक्ती स्वातंर्त्य स्वैराचाराकडे जाणार असेल तर ते मान्य करू शकत नाही. कामराचा पुर्वइतिहास पाहिला तर देशाच्या उच्चपदस्थ व्यक्तींच्या विरोधात मग ते पंतप्रधान असोत वा न्यायाधीश-न्यायव्यवस्था असो यांच्यासंदर्भात अत्यंत खालच्या दर्जात बोलणे, न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही असे बोलणे ही त्याची कार्यपद्धती आहे. वादग्रस्त बोलून प्रसिद्धी मिळविण्याचा त्याचा हव्यास आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्याने प्रयत्न केला. आपल्यात मतभेद असू शकतात. पण ज्या नेत्याबददल जनतेत आदरभाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जात कामरा बोलतो. लगेचच विरोधक तात्काळ त्याच्या समर्थनात बोलायला उभे राहतात. कोणी टवीट करतो,कोणाची क्लिप येते. हे ठरवून चालले आहे का? कामराला सुपारी दिली आहे. तुम्ही दुस-याच्या स्वातंर्त्यावर घाला घालता तेव्हा तुमचे स्वातंर्त्य मर्यादित होते. तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही. त्याने माझ्यावर, शिंदेंवर राजकीय व्यंग करावे टाळया वाजवून दाद देउ. पण कोणी सुपा-या घेउन बदनामी करत असेल तर कारवाई होणार. मग छात्या बडवू नका. या गोष्टी महाराष्ट्रात सहन करणार नाही. विनाकारण सुपा-या घेउन बोलणा-या लोकांना धडा शिकवावा लागेल. महाराष्ट्राचे मानसिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम करत आहेत. मध्यंतरी रणवीर अलाहाबादियाने वक्तव्य केले. ते सहन कसे करणार. स्वातंत्र्याचा स्वैराचार होउ दयायचा नाही. कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

महाराष्ट्रातील जनतेनेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण खुद्दार, कोण गद्दार हे दाखवून दिले आहे. बाळासाहेबांचा वारसा जनतेने शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिला आहे. सध्या लेफट लिबरल विचार तयार झाले आहेत यांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे समाजातल्या मानकांना अपमानित करणे. देशातील संस्थांना अपमानित करणे. लोकांचा विश्वास उठला पाहिजे असे वक्तव्य करणे हाच यांचा उददेश आहे. मात्र याबाबत कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR