मुंबई : प्रतिनिधी
राज्यातला शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला असताना या शेतक-यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला आहे. पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानात नवीन फर्निचरसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. डबल बेड मैट्रेस, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये, तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख रुपये खर्च केला जात आहे. यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावे की वाढलेली महागाई? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदेनुसार वर्षा निवासस्थानी डबल बेड मॅट्रेससह ८ बेड, ४ डबल सीट सोफा सेट, २ सिंगल सीट सोफा सेट, १५ खुर्चा आणि ६ टेबल खरेदी केले जाणार आहेत. त्यासाठी २० लाख ४७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय वर्षावरील स्वयंपाक घर दुरुस्तीसाठी १९ लाख ५३ हजार रुपये किंमतीची निविदा काढण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर टीका केली आहे. आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना आणि राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी डबल बेड मॅट्रेस, सोफा यासाठी २० लाख ४७ हजार रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९ लाख ५३ हजार रुपये असा एकूण ४० लाखांहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावे की वाढलेली महागाई? असा सवाल पवार यांनी एक्स या समाज माध्यमातून केला आहे.
तर रोम जळत आहे… : रोहीत पवार
मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असेच चालू राहिले तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल… मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामे केली पाहिजेत. पण केव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना, असेही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.