पुणे : ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणी चौकशी सुरू असतानाच आणखी एका आधिका-याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे तशी आरोपींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ललित पाटील प्रकरणात आणखी एका वैद्यकीय अधिका-याला पोलिसांनी अटक केली आहे.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ससून रुग्णालयात सर्वाधिक काळ डॉ. देवकाते याने ललित पाटील याच्यावर वैद्यकीय उपचार केल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे.
ललितचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी त्याला मदत केल्याच्या आरोपावरून डॉ. देवकाते याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी संबंधित अधिका-याला आधी निलंबित करण्यात आले होते. निलंबित झाल्यानंतर काल या अधिका-याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलला त्याच्या आजारात आणि पळून जाण्यास देखील देवकाते यांनी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे. डॉ. प्रवीण देवकाते यांच्या निगराणीखाली ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत होता.
पुणे पोलिसांनी काल येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे याला अटक केली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकाते यांना सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.