पुणे : राज्यात मराठा आंदोलन उग्र झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वत्र साखळी उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. त्याचवेळी आंदोलकांकडून लालपरीला लक्ष्य केले जात आहे. यामुळे राज्य परिवाहन मंडळ पुन्हा आर्थिक गर्तेत अडकले आहे.
कोरोना काळानंतर महामंडळाच्या कर्मचा-यांनी राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्यामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला होता. तो आता सुस्थितीत येत असताना पुन्हा मराठा आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांत एसटीचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एसटीला चांगले दिवस येत होते. परंतु मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. त्याचा थेट फटका हा एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाचे आतापर्यंत सुमारे १७ ते २० कोटींचे नुकसान झाले आहे.
येवला आगारातून अनेक फे-या रद्द
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनामुळे बसेसचे नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला आगारातून जवळपास १३२ फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे येवला आगाराचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
संभाजीनगरच्या आठही आगारांत बस जागेवरच उभ्या
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत महामंडळाला दीड कोटीचा तोटा झाला आहे.
प्रवाशांचे हाल..
मराठा आरक्षणावरून होत असलेल्या हिंसक आंदोलनानंतर आता एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान याचा फटका प्रवाशांना बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे सणासुदीचा काळ असल्याने अनेकजण गावाकडे जात असतात. मात्र, बसच बंद असल्याने गावाकडे कसे जावे असा प्रश्न प्रवाशांना बसत आहे.
ग्रामीण भागातील इंटरनेट बंद…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. काही लोक सोशल मीडियावर अफवा देखील पसरवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून इंटरनेट बंद करण्यात आले आहे. बुधवारपासून छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. तर, ३ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद असणार आहे.